Failed to add new visitor into tracking log कुर्डुगड | विश्रामगड | Kurdugad Fort | Kurdugad Killa | Vishramgad | Kurdu Peth
English
Marathi

कुर्डुगड (विश्रामगड)

रायगड ,पेठवाडी

कुर्डुगड (विश्रामगड) फोटोगॅलरी

माणगाव हा रायगड जिल्ह्यामधील तालुका आहे. माणगाव हे मुंबई पणजी महामार्गावर वसलेले आहे. ताम्हीणीघाटामुळे ते पुण्याशीही उत्तम प्रकारे जोडले गेले आहे.

या माणगाव तालुक्यामधे एका अनगड ठिकाणी कुर्डुगडाचा किल्ला दबा धरुन बसलेला आहे. फारसा परिचित नसलेला कुर्डुगड मोसे खोऱ्यातील पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवाजीराजांचे समकालीन आणि सहकारी होते. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात.

सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डुगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे. या धारेवर कुर्डुपेठ नावाची लहानशी वस्ती वसलेली आहे. या वस्तीमधे कुर्डाईदेवीचे मंदिर आहे. म्हणून किल्ल्याला कुर्डुगड असे नाव पडले आहे.

जिते गावातून गडावर जाणारी पायवाट २००६ साली झालेल्या प्रचंड पावसामुळे नष्ट झाली. डोंगराचा मोठा कडा ढासळल्यामुळे ही वाट बंद झाली. त्यामुळे जिते गावातून कुर्डुगडाचा डोगर उजव्या हाताला ठेवून दोन-तीन कि.मी. अंतरावरील उंबर्डी गाव गाठावे लागते. या उंबर्डी मधून सध्या गडावर जाणारी वाट आहे.

समुद्र सपाटीपासून ८८२ मीटर उंचीच्या कुर्डुगडास जाण्यासाठी मोसे खोऱ्यातूनही जाता येते. त्यासाठी पुणे-पानशेत मार्गे गाडीने जावून मोसे खोऱ्यातील धामणगाव गाठावे लागते. धामणगावा जवळून पायवाटेने लिंग्या घाटाच्या माथ्यावर पोहचून लिंग्या घाटाने खाली उतरावे लागते. अर्ध्या घाटातच कुर्डुगडाचा किल्ला आहे. यासाठी धामणगावापासून तीन-तासांची पायपिट करावी लागेल. हा मार्ग जरी अडचणीचा असला तरी निसर्गाची सोबत आणि त्याचे रौद्रत्व मनाला भुरळ पाडणारे आहे.

ताम्हीणी घाटातील सर्वात दक्षिणेकडील एका वळणावरुन कुर्डुगड दिसतो. येथे उतरल्यास सर्वात सोयीचे आहे. येथून खिंडीतील वाटेने उंबर्डीला तासा दीडतासात पोहचता येते. त्यामुळे वेळ, श्रम व अंतराची बचत होवू शकते.

उंबर्डी मधील प्राचीन मंदिराचे अवशेष पाहून समोरचा डोंगर चढून आपण कुर्डुपेठमधे दीड तासामधे पोहोचू शकतो. कुर्डुपेठेतील कुर्डाईदेवीचे दर्शन घेवून दहा मिनिटांमधे किल्ल्यात पोहोचता येते. वाटेजवळ पाण्याचे टाके आहे. या टाक्यांतील पाण्याचा वापर उन्हाळ्यामधे गावकरी करतात.

हे टाके पाहून पुढे आल्यावर काही चढाईकरुन आपण सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या भागामधे बुरुज तसेच तटबंदी असे दूर्गावशेष पहायला मिळतात. कुर्डुगडाचे विशेष म्हणजे त्याच्या सुळक्याच्या पोटात असलेली नेसर्गिक गुहा. छताचा भाग हळुहळु कोसळून ही गुहा निर्माण झाली. मोठय़ा विस्ताराची ही गुहा जमीन समतल नसल्याने वापरण्या योग्य नाही. पण या प्रचंड गुहेच्या छताने माथ्यावरच्या सुळक्याचे वजन कसे पेलले असेल हे पाहून मात्र आश्चर्य वाटते.

येथून उत्तर कडय़ावरील हनुमंत बुरुजावर जाता येते. येथे हनुमंताची मूर्ती आहे. ही देखणी मूर्ती मात्र सध्या एकसंघ राहिली नाही. येथून पूर्व बाजूला आल्यास खालच्या दरीचे उत्तम दर्शन घडते. या बुरुजाला कडेलोटाचा बुरुज असेही म्हणतात. गडावरच्या मुख्य अशा मोठय़ा सुळक्याजवळ एक लहान सुळकाही आहे. या दोन्ही सुळक्यामधे जाण्यासाठी असलेली वाट काहीशी अवघड आहे. छोटा पण आटोपशीर आकाराचा कुर्डुगड पहाण्यासाठी तासाभराचा अवधि पुरेसा आहे. मुक्कामासाठी कुर्डाई मंदिर सोयीचे आहे. वेळेच्या नियोजनाप्रमाणे परतीची वाट आपल्याला निवडता येईल. मात्र कुर्डुगडाचा सुळका आपल्या चांगल्याच स्मरणात राहील.

जेवणाची सोय आपण स्वतः करावी. किल्ल्यावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :
  किल्ल्यावर असणाऱ्या घळीत राहण्याची सोय होते.

 • कसे जावे :
  माणगाव कडून एस.टी बसने अथवा गाडी मार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव गाठावे लागते. माणगाव निजामपूर शिरवली जिते असा तासाभराचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास एस.टी. अथवा खाजगी वाहनानेही करता येतो.

 • विमान:

 • रेल्वे :

 • बस:

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर जातांना वाटेतच एक भग्नावशेष झालेला दरवाजा आढळतो. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच होय. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच १ मी. उंचीची हनुमान मूर्ती आपल्या नजरेस पडते. मूर्तीच्या मागच्या बाजूस एक निसर्गनिर्मीत घळ आहे. यात १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत. आणि हा भलामोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. किल्ल्यावर पाण्याची एक दोन टाकी आहेत. किल्ल्यावरून संपूर्ण कोकण परिसर न्याहळता येतो. कुर्डुगडाचे स्थान हे फार मोक्याच्या ठिकाणी आहे. पुण्याहून कोकणात येणाऱ्या ताम्हणी घाटाच्या वेशीवरच हा किल्ला आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूस रायगड, कोकणदीवा हे किल्ले आहेत. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धातास पुरतो.

 • नकाशा : कुर्डुगड (विश्रामगड)

 •  
 • Social Links :