मंगळगड किल्ला रायगड ,दुधाणेवाडी | Mangalgad Killa mahad

रायगड जिल्ह्यामधील काही किल्ले हे सर्वसामान्य आणि डोंगर भटक्यांना चिरपरिचित आहेत तर काहींची ओळखही अनेकांना नाही. अशाच किल्ल्यापैकी असलेला किल्ला म्हणजे कांगोरीगड. कांगोरीगडाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी मंगळगड असे केले.

   शिवकालीन इतिहासामधे जावळीचा उल्लेख येतो. जावळीचे चंद्रराव मोरे इतिहास प्रसिद्ध झाले आहेत. जावळी गाव हे महाबळेश्वर च्या पश्चिम पायथ्याला आहे. घनदाट जंगलाने व्यापलेली होती. उत्तुंग डोंगर आणि पाताळवेरी दर्‍याखोरी असलेला हा परिसर निसिड जंगलामुळे अधिकच दुर्गम झालेला आहे. त्यामधील अनगड घाटवाटा आणि फसव्या पायवाटांमुळे कोणीही जावळीच्या वाटेला जात नसे. त्यामुळे चंद्रराव मोरे हे अदिलशहाच्या कृपाछत्राखाली जावळीच्या सहा

्याने स्वत:ला अनभिषीक्त राजे म्हणवून घेत असत. 

     शिवाजी महाराजांना जावळी स्वराज्यात हवी होती. पण मोरे दाद लागू देत नव्हते. महाराजांनी सामेपचाराने मोर्‍यांना समजावले पण मोर्‍यांनी स्वराज्यात दाखल होण्याऐवजी महाराजांनाच खरमरीत पत्र लिहले तुम्ही काल राजे जाहला, तुम्हास राज्य कोणी दिधले ? आपल्या घरी आपणच फुकटचे राजे म्हणवून घेतले तर कोण मानील ? जावळीला याल तर तुमचा एक माणूसही परत जाणार नाही. तुमच्यात पुरुषर्थ असेल तर उद्या येणार ते आजच यावे. पातशहाने आम्हास राजे किताब दिला आहे. मोरचेल आणि सिंहासनही आम्हास त्याने दिले आहेत. आमच्याशी कटकट कराल तर विचार करुन करा. येथे उपाय कराल तर अपाय होईल. यश न घेता अपयशाला पात्र होवून जाल या मोर्‍यांच्या पत्राने महाराजांच्या लक्षात आले की, चंद्रराव मोर्‍यास मारल्याविरहीत राज्य साधत नाही महाराजांनी मोका हेरला आणि जावळीवर हल्ला केला. मोर्‍यांचा खातमा करुन जावळी स्वराज्यात दाखल केली. रायगडापासून कोयने पर्यंतचा मुलुख स्वराज्यात दाखल केला. रायगड, कांगोरी, चंद्रगड, वाझोटा असे किल्ले स्वराज्यात आले. कांगोरीगडाचे नाव महाराजांनी मंगळगड असे ठेवले.

  मंगळगडाला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत. चंद्रगड पाहून तेथून महादेव मुर्‍ह्यामार्गे अंदाजे सहातासांच्या पाय प्रवासानंतर आपण मंगळगडाला पोहोचू शकतो. या पायी मार्गावर आपल्याला दोनदा डोंगर चढून उतरावा लागतो. भोर महाड मार्गावर वरंधा घाट आहे. वरंधा घाटाच्या कोकणातील पठारावर माझेरी गाव आहे. या माझेरीतूनही डोंगरदर्‍या, ओढे नाले ओलांडीत सहासात तासांच्या जंगलातील पायपिटी नंतर आपण मंगळगड गाठू शकतो. महाडकडून भोर कडे जाताना भिरवाडीच्या पायथ्याच्या पिंपळवाडी कडे जाणारा फाटा आहे. या गाडीरस्त्यानेही आपण पिंपळवाडीला तासाभरात पोहोचू शकतो. महाडहूनही एस.टी. बसेस ठरावीक वेळेत पिंपळवाडीसाठी आहेत.

 पिंपळवाडीतून गडावर जाणारी वाट म्हणजे छातीवरचा चढच आहे. त्यामुळे सोबत पाणी घेवून चढणे आवश्यक आहे. चांगल्या चालीने दीड तासात आपण गडावर पोहोचतो. एका उध्वस्त झालेल्या दरवाजांच्या अवशेषामधून आपण शिरतो. गडाचा विस्तार बर्‍यापैकी मोठा आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावर वाडय़ाचे अवशेष आहेत. उत्तर अंगाला पाण्याची कातळकोरीव टाकी आहेत. गडाला एक माची आहे. माची तटबंदीने बांधून काढलेली आहे. कातळमाथ्याच्या खाली दोन लहान सुळके आहेत. त्यांना स्थानिक लोक नवरानवरीचे सुळके म्हणतात. 

माचीवर कांगोरी देवीचे मंदिर आहे. या उंचीवर येवून कांगोरीदेवीचे दर्शन घेणे अतिशय कष्टप्रद असल्याने भक्तांनी खाली दुधाणेवाडीत या मुर्तीचे प्रतिरुप स्थापन करुन आपली सोय करुन घेतली आहे. गडावर वर्षातून एका देवीचा उत्सवही साजरा करतात. 

गडाच्या फेरीमधे तटबंदी, ध्वस्त दरवाजा, माची, शिवलिंगाची पिंड, देवीचे मंदिर, दिपमाळ, घरांची जोती इत्यादी पहायला मिळतात. गडावरुन मकरंदगड, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, असे किल्ले दिसतात. तसेच रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारे ही आपल्याला पहायला मिळतात. 

   मंगळगडावरुन अस्वलखिंड मार्गे रायरेश्वरालाही जाता येते. मात्र सोबत अनुभवी वाटाडय़ा हवा. मंगळगडाची मंगलदायी डोंगर भ्रमंती करुन उतरताना दुधानेवाडीकडील सोप्या वाटेने उतरणे सोयीचे पडते.

 जेवणाची सोय : जेवणाची सोय गडावर नाही, स्वत: करावी
   पाण्याची सोय :बारामाही पाण्याची सोय आहे.