थिबा राजवाडा रत्नागिरी , -थिबा पॅलेस

ऐतिहासीक थिबा पॅलेस : रत्नागिरी शहरातील 'थिबा राजवाडा' ही भव्य ऐतिहासीक वास्तू पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. इंग्रजानी ब्रह्मदेशाच्या थिबा राजाला 1885 साली स्थानबद्ध करुन रत्नागिरीत आणले. त्याच्यासाठी सन 1910 साली हा तीन मजली पॅलेस इंग्रज सरकारने बांधला. या पॅलेसमध्ये थिबा राजा सन 1911 मध्ये राहण्यासाठी गेला. राजवाड्याच्या गच्चीवरून समुद्रकिनाऱ्याचा निसर्गरम्य परिसर दिसतो. मागच्या बाजूस राजाने ब्रह्मदेशातून आणलेली बुद्धाची मुर्ती आहे. याच भागात पुरातन वस्तुसंग्रहालय आहे. तळमजल्यावर प्राचीन मुर्त्या आणि वरच्या मजल्यावरील चित्रप्रदर्शन कलाप्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे. सोमवार सोडून इतर दिवस हा पॅलेस पर्यटकांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुला असतो.

> थिबा राजवाडा हा आत्ताचं म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रम्हदेशच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली. १९१६ पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. आता या राजवाडयात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर ब्रह्मदेशच्या राजाची एक वास्तू कधीची पाय रोवून बसली आहे. नाव- थिबा पॅलेस! ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या या राजाला आपल्या आयुष्याची तब्बल तीस वर्षे इथे बंदिवासात काढावी लागली. त्याच्या या वास्तव्यातच त्याने बनवलेल्या या राजवाडय़ात त्याची स्मरणगाथा जागवणारे एक संग्रहालय नुकतेच आकारास आले आहे. थिबाचे हे संग्रहालय पाहण्यापूर्वी त्याचा हा राजवाडाच आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतो. २७ एकरांचा हा भव्य परिसर आणि त्याच्या अगदी मधोमध ही उंची वास्तू! कोकणचा जांभा दगड, ब्रह्मदेशचे ‘बर्मा टीक’ लाकूड आणि ब्रिटिशांचे स्थापत्यविशारद यातून ही ब्रह्मदेशी शैलीतील देखणी वास्तू उभी राहिली. दुमजली बांधकाम, त्यावर तिसऱ्या मजल्याची गॅलरी! एकूण चौदा खोल्या आणि दोन मोठाली दालने;

याशिवाय स्वयंपाकघर, स्नानगृह, सज्जे, गच्ची, दादरे यांची रचना, तसेच संपूर्ण इमारतीभोवती कोकणी घरांप्रमाणे उतरत्या छपराचा व्हरांडा! राजवाडय़ाच्या सज्जातून आत शिरताच त्याची भव्यता जाणवू लागते. उंची दालने, त्याला जागोजागी खिडक्या-दारांच्या कमानी. दोन भागातील या इमारतीच्या मधोमध आकाश खुले करणारा मोकळा चौक, पुढे-मागे बागेची रचना, खुल्या चौकात चुन्याच्या निवळीवर चालणारे तत्कालीन कारंजे. असा हा सारा भरजरी बाज आल्याआल्याच त्या राजवाडय़ाची दखल घ्यायला लावतो.

भिंतीतील जागोजागीच्या कमानीच्या खिडक्या तर मोहातच पाडतात. या मोठाल्या खिडक्या आणि मधला मोकळा चौक यामुळे साऱ्या रत्नागिरीत अंगाशी चिकटणारा घाम इथे मात्र वाऱ्यालाही उभा राहत नाही. साऱ्या खोल्या-दालनांमधून हवा-प्रकाश आणि आल्हाददायक गारवाच भरून राहतो. हे सारे अनुभवत गच्चीवर आलो, की तो निळाशार समुद्र आणि नारळी-पोफळीत झाकलेली भाटय़ेची खाडी एकदम नजरेत भरते. दिवसाची ही निसर्गदृश्ये! पण कधी काळी या वाडय़ाला रात्रीचेही सौंदर्य असे. त्या काळी इथे विजेची सोय नव्हती. रात्र झाली की साऱ्या प्रासादातून तेलाचे दिवे उजळले जात; ज्यामुळे या काचेच्या खिडक्यांमधून हा सारा राजप्रासादच उजळलेला भासे. दिवाळीतील दीपोत्सवाने तर साऱ्या महालाचाच ‘आकाश कंदील’ होत असे. मग त्याचे हे सौंदर्य पाहण्यास रत्नागिरीकर इथे पायधूळ झाडत. थिबा पॅलेसच्या या आरसपानी सौंदर्यामुळेच त्याच्यावर मग ‘ग्लास पॅलेस’, ‘कहानी थिबा राजाची’ अशा अनेक कथा-कादंबऱ्याही लिहिल्या गेल्या. असो. थिबाच्या राजवाडय़ाचे हे सौंदर्य पाहतच आपण संग्रहालयात शिरतो. इथे दाराशीच एक बोलका फलक खास कोकणी शैलीत सूचना करत असतो, ‘आपले पाय थिबाच्या राजवाडय़ास लागूद्यात; चप्पल-बूट नकोत!’ कुठलेही संग्रहालय हे मंदिरासारखेच पवित्र स्थळ असते. प्राचीन संस्कृतीची देवता इथे वास करत असते. तेव्हा चप्पल-बुटांचा वापर इथे निषिद्धच! पण आमच्याकडे कुठल्याही शेंदूर फासल्या दगडापुढे चप्पल काढणारी मंडळी इथे मात्र उद्दामपणे चप्पल-बूट घालून वावरतात. या साऱ्यातून आमचा आमच्याच प्राचीन इतिहास-संस्कृतीबाबतचा आदर मात्र स्पष्ट होतो. चार दालनांचे हे संग्रहालय! पैकी पहिली तीन ही प्राचीन कोकणचे दर्शन घडविणारी आहेत. जागोजागी मिळालेली शैलशिल्पं, देवता, मूर्ती, वस्तू, त्याविषयीची छायाचित्रे या दालनांमध्ये मांडली आहेत. प्राचीन वीरगळांचे अनेक नमुने, देवदेवता इथे या शिल्पांतून दिसतात. पण या साऱ्यातही दाराशी असलेले सूर्य आणि भैरवाची पुरुषभर उंचीची सुघड मूर्ती चार क्षण थांबवते. आतील विष्णू, ब्रह्म, धनुर्धारी राम आदींच्या रेखीव मूर्तीही खिळवून ठेवतात. एका दालनात प्राचीन-ऐतिहासिक कोकण दाखवणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंचे चित्रप्रदर्शन आहे; ज्यातून कोकणातील गड-किल्ले, लेणी-मंदिरे अशी अनेक ऐतिहासिक स्मारके या परशूराम भूमीचे दर्शन घडवतात. हे सारे पाहतानाच आपण त्या थिबाच्या दालनापुढे उभे राहतो. राजाच्या दरबाराप्रमाणे हे दालन उंची पडदे, गालिचे, झुंबर आदींनी सजवले आहे. गेल्यागेल्या समोरच एका उंच बैठकीवर लोड-तक्क्य़ांना खेटून राजा थिबाचे ते ऐतिहासिक तैलचित्र मांडलेले आहे. भोवतीने पुन्हा अशीच काही आसने, बैठका. या साऱ्यांवरही राजघराण्यातील तैलचित्रे! ही तैलचित्रे पाहत असताना मधेच थिबाच्या वापरातील खुर्ची, बैठक, काचेची भांडी व अन्य फर्निचर दिसू लागते. यातील बैठका तर उंची कोरीवकाम केलेल्या! भारदस्त वस्तू एखाद्या चिरेबंदी वास्तूत आणखीच भारदस्त वाटू लागतात. या वस्तू पाहत असतानाच थिबाचे हे दालन त्याचा इतिहासही सांगू लागते.

थिबा हा ब्रह्मदेशचा (आत्ताचा म्यानमार) शेवटचा राजा. राजे मिडॉनचा हा पुत्र. त्या देशातील ‘पाध्यामारक्या’ ही सर्वोच्च पाली पदवी मिळवलेला हा राजा लोककल्याणकारी होता. त्याने देशात अनेक विकासाची कामे करताना कायद्याचे राज्य आणले. ब्रह्मदेशातील गुलामगिरी नष्ट केली. मात्र हे सारे करत असतानाच ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारात तो त्यांना अडचणीचा ठरू लागला. शेवटी त्यांनी थिबाचा पराभव करत २५ नोव्हेंबर १८८५ रोजी त्याला अटक केली. पुढे त्याला ब्रह्मदेशातच ठेवल्यास उठाव होईल या भीतीने ब्रिटिशांनी या राजाला त्याच्या मातृभूमीपासून शेकडो मैल दूर रत्नागिरीला हलवले. १६ एप्रिल १८८६ रोजी थिबा रत्नागिरीत पोहोचला. या वेळी त्याच्या सोबत त्याच्या दोन राण्या सुफायगले ऊर्फ सुपायगी आणि सुपायलात, तसेच अन्य राजपरिवार होता. रत्नागिरीच्या या बंदिवासातच १९०६ मध्ये थिबाने हा राजवाडा बांधावयास घेतला आणि १३ नोव्हेंबर १९१० रोजी तो यामध्ये राहण्यास आला. राजवाडा झाला, थिबा त्यामध्ये आपला दरबारही भरवू लागला. पण ब्रिटिशांनी त्याचे त्याच्या देशापासूनच नव्हे, तर भोवतालापासूनच सर्व संबंध तोडून टाकले. त्याच्या मुलींची लग्नेही त्याला त्यांच्या देशात जाऊन करू दिली नाहीत. यातच त्याची पहिली पत्नी सुफायगलेचे २५ जानेवारी १९१२ रोजी निधन झाले; त्यामुळे तो अधिकच एकाकी झाला. या नैराश्यातच थिबाचे १५ डिसेंबर १९१६ रोजी निधन झाले. मातृभूमीपासून तुटलेल्या या राजाच्या पार्थिवावर तरी त्याच्या देशातच अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी त्याची दुसरी पत्नी सुपायलातने खूप प्रयत्न केले. ब्रिटिशांबरोबरच्या या पत्रव्यवहारात आणि मायभूमीच्या ओढीने थिबाचे हे पार्थिव तब्बल अडीच वर्षे कोळशाची पूड आणि कापूर घालून शवपेटीत राखण्यात आले. पण निर्दयी ब्रिटिश सरकारने त्यांची ही मागणी अखेपर्यंत धुडकावून लावली. अखेर १९ मार्च १९१९ रोजी थिबावर रत्नागिरीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राणी सुपायलात दु:खी होत ब्रह्मदेशात परतली.

ब्रिटिशांविरुद्ध लढणारा थिबा रत्नागिरीत तब्बल तीस वर्षे बंदिवासात राहिला. रत्नागिरीचा त्याचा राजवाडाही उपेक्षेचा धनी बनला. १९२६ ते १९६१ रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान, त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन आणि मग बरीच वर्षे एक अनाथ वास्तू अशी या राजवाडय़ाची आणि थिबाच्या इतिहासाची अवस्था होती. तब्बल पाऊणशे वर्षांनंतर १९९४ मध्ये थिबाचे काही वंशज रत्नागिरीचा शोध घेत इथे धडकले आणि झाल्या दर्शनाने पुरते खंतावले! त्यांनी भारत सरकारकडे याबाबत खेद व्यक्त केला. विषय प्रतिष्ठेचा होत सूत्रे वेगाने हलली. थिबाच्या राजवाडय़ाला स्मारकाचा दर्जा प्राप्त झाला. राजवाडय़ाचे जतन सुरू झाले, इतिहास संकलित होऊ लागला. वस्तू गोळा होऊ लागल्या आणि स्मारक संग्रहालयाच्या रुपाने हा राजवाडा पुन्हा ‘थिबाची स्मरणे’ गाऊ लागला!

राहण्यासाठी खोल्या :
थिबा पॅलेस जवळ हॉटेल्स उपलब्ध आहेत.