कड्यावरचा गणपती रत्नागिरी ,आंजर्ले

एका बाजूला अथांग समुद्र, एका बाजूला जोग नदी व खाडी असलेले हे कोकणातील खूप निसर्गरम्य, शांत गाव. कड्यावरचा गणपती हे एक रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले ह्या गावाचे प्रसिद्ध व पुरातन सिद्धिविनायक मंदिर आहे. हे गणपती मंदिर समुद्रालगतच्या टेकडीवर आहे. दाट हिरवाळीत हे मंदिर पूर्वाभिमुख आहे.

किना-यावर अजरालयेश्वर हे शंभूमहादेवाचे व सिद्धिविनायकाचे अशी दोन मंदिरे होती. जसजशी समुद्राची पातळी वाढू लागली तसतसे हे मंदिर पाण्यात जाऊ लागले. त्यामुळे गणपतीने आपला मुक्काम जवळच्या कड्यावर हलविला.कारण मंदिराच्या वाटेवर गणपतीचा पाय म्हणून एक ठसा उमटला आहे. गणपतीने समुद्रातून टाकलेले हे पाऊल म्हणून त्याची भक्तीभावाने पूजा केली जाते.अजरालय या मंदिरावरून आंजर्ले हे नाव

डले अशी समजूत आहे. नंतर गावच्या लोकांनी या टेकडीवर हे गणपतीचे व महादेवाचे अशी दोन देवळे बांधली. यालाही खूप काळ लोटल्यावर ती जीर्ण झाली.

त्यावेळी रामकृष्ण हरभट नित्सुरे यांना मंदिराचा जीर्णोद्धार करावा असा दृष्टान्त झाला व त्यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला व याला सध्याचे रूप दिले. हे काम शके १७०६ (सन १७८४) मध्ये पूर्ण झाले. या मंदिराची लांबी ५५ फूट, रूंदी ३९ फूट व उंची ६२ फूट आहे. मंदिराच्या बांधणीवर वेगवेगळ्या काळातील म्हणजे मोगल, रोमन, गोथीक शैलीचा अंमल दिसतो. मंदिरास ६ फूट उंचीचा एक दगडी तट आहे.

मंदिराची रचना त्रिस्थळी म्हणजे सभागृह, अंतराळ, गर्भगृह अशी आहे.सभागृहाला आणि गर्भगृहाच्या वर गोल घुमट आहे. गर्भगृहाच्या वर १६ उपकलश आणि अष्टविनायकाच्या रेखीव प्रतिमा आहेत.सर्व घुमटांच्या टोकाशी कमलपुष्प दिसते. मंदिराला एकूण २१ कळस आहेत. सभागृहाला ८ कमानी आणि सुंदर घुमटाकृती छत आहे. अंतराळ हे गर्भगृहाच्या पेक्षा लहान आहे. तेथे घंटा लावलेल्या आहेत.

गाभा-यातील गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. ती उजव्या सोंडेची असून ५ फूट सिंहासनाधिष्ठीत आहे. मूर्ती बेसॉल्ट रॉकपासून बनविलेली आहे. ही मूर्ती तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धिसिद्धिच्या सुमारे एक फूट उंचीच्या मूर्ती आहेत.

मंदिराच्या आवारातच काळ्या पाषाणाचे शिवमंदिर आणि अष्टकोनी तळे आहे. मंदिराच्या चारही कोप-यावर पुरातन बकुळ वृक्ष असून वनस्पती शास्त्रांच्या म्हणण्यानुसार ते सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत. येथे माघी उत्सव जोरात होतो.