गणपतीपुळे समुद्रकिनारा रत्नागिरी ,गणपतीपुळे


रत्नागिरी जिल्ह्यावर परमेश्वराचा वरदहस्त आहे. गणपतीपुळे, पावस, आडिवरे, मार्लेश्वर, कसबा, अशी अनेक तीर्थक्षेत्रे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. सा-या बाजूंनी रत्नागिरी जिल्हा समृद्ध आहे. अगदी तिथल्या माणसांपासून ते निसर्गापर्यंत सारं काही आपलंसं करणारे आहे. कोकणातली माणसं तर त्यांच्या अगत्यासाठी प्रसिद्ध आहेतच, पण निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोकणदेखील आपल्याला कायमच खुणावत असतं.

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. स्वयंभू गणेशाचे हे स्थान अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्यअसे की हे मंदिर समुद्रकिनारी आहे. किनारा आणि मंदिर यातील अंतर फार तर फार पाच मिनिटे असेल. मंदिरातून बाहेर पडल्यावर लगेच आपण

िना-यावरच उतरतो. एका बाजूला समुद्र म्हणजे वाळू तर दुस-या बाजूला खडकाळ प्रदेश असे हे अनोखे आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील बाप्पाला आवडणा-या दुर्वा मात्र तिथे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.

येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मी. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो. देवळासमोरील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा मनमोहक आहे.

राहण्यासाठी खोल्या :
गणपतीपुळे यथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.