Peb fort RAIGAD , NERAL - पेब (विकटगड किल्ला) ,नेरळ

पनवेलच्या ईशान्येला, मुंबई - पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन - चार किलोमीटर अंतरावर पेबचा किल्ला (विकटगड) आहे. गडाखालच्या पेबी देवी वरून या किल्ल्याचे नाव पेब ठेवण्यात आलेले असावे. माथेरान सारख्या सुंदर थंड हवेच्या ठिकाणा जवळ, पण माणसांच्या गर्दीपासून दूर असलेला पेबचा किल्ला एका दिवसाच्या ट्रेकसाठी आदर्श जागा आहे. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ ,चढण्याची वाट, वरील गुहेची रचना, गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड अजोड आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ, माथेरान, पनवेल या तिनही ठिकाणांहून वाटा आहेत.

इतिहास :

या किल्ल्याचे मूळ नाव "पेब" हे नाव पेबी देवीवरून पडले

सावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.

जेवणाची सोय :

जेवणाची सोय आपण स्वत: करावी.

पाण्याची सोय :

१) मोठ्या गुहेजवळील शिडी जवळ असलेले पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्या योग्य आहे. २) महादेव मंदिराच्या बाजूला थंडगार पाण्याचे टाक आहे

राहण्यासाठी खोल्या :
किल्ल्यावर गुहेमध्ये ५० जणांच्या राहाण्याची सोय होते. पण रात्री येथे उंदरांचा फार त्रास होतो

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

पेबचा किल्ला नेरळ किंवा पनवेल मार्गे चढून आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक प्रचंड गुहा दिसते. या गुहेत साधारणत: १०० जण राहु शकतात. या गुहेच्या बाजूला चौकोनी तोंड असलेल्या गुहा आहेत. या गुहांमध्ये रांगत जाता येते. यातील एका गुहेत खालच्या बाजूला एक माणूस बसू शकेल इतकी छोटी खोली आहे. मोठ्या गुहेच्या वरच्या बाजूस सुध्दा अशाच प्रकारच्या गुहा आहेत. त्यापैकी शेवटच्या गुहेच्या आत टोकाला पाण्याच टाक आहे. ( मोती गुहा सोडून इतर सर्व गुहांमध्ये जाण्यासाठी विजेरी आवश्यकता आहे.) या गुहा पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या भिंतीचे अवशेष दिसतात. त्यावर चढून जाण्यासाठी एक शिडी आहे. या शिडीवर न चढता खालच्या बाजूस गेल्यावर कातळात खोदलेली २ पाण्याची टाक पाहायला मिळतात.पुन्हा शिडीजवळ येऊन शिडी चढून गेल्यावर उजव्या हाताला पाण्याचे कातळात खोदलेले टाक आहे. त्याच्या बाजूलाच हनुमानाची मुर्ती आहे. येथून वर चढून उजव्या हाताला वळल्यावर वास्तुंचे अवशेष आहेत. तिथून पुढे गेल्यावर आपण दत्तमंदिरा/ आश्रमा जवळ पोहोचतो. या मंदिराच्या बाजूने किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्याची वाट आहे. या वाटेवर एक शिडी आहे. ही शिडी चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. येथे दत्ताच्या पादुका आहेत. येथून पूर्वेकडे नेरळ व उल्हास नदी , पश्चिमेकडे गाडेश्वर तलाव, पनवेल, उरण, उत्तरेकडे म्हैसमाळ ,चंदेरी, ताहूली ही डोंगररांग व दूरवर मलंगगडाचे सुळके दिसतात. दक्षिणेकडे माथेरनचा डोंगर व प्रबळगड दिसतो. पादुकांचे दर्शन घेऊन परत दत्तमंदिरा जवळ येऊन गडाच्या दक्षिण टोकाकडे जावे. येथे गडावरील एकमेव बुरुज आहे. माथेरान मार्गे गडावर येतांना आपण या बुरुजा खालून येते. बुरुज पाहून परत दत्तमंदिरा जवळ येउन खालच्या बाजूला गेल्यावर कड्याजवळ २ पाण्याच्या कोरडी टाकं आहेत. या टाक्र्‍यांच्या पुढे महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवर पेबी देवीची मुर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या बाजूला थंडगार पाण्याचे टाक आहे. या टाक्याच्या भिंतीवर यक्ष प्रतिमा कोरलेली आहे. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. येथून आल्या मार्गाने किल्ला उतरुन नेरळ किंवा पनवेलला जाता येते किंवा बुरुजा खालच्या वाटेने माथेरान - नेरळ रस्त्यावर पोहोचून नेरळला जाता येते.