रामगड किल्ला , कणकवली | Ramgad Fort Kankavli

रांगणा गडाजवळ उगम पावणारी गड नदी ८० किमी अंतर कापून समुद्राला मिळते. या गडनदी मार्गे होणार्‍या व्यापारावर, जलवहातूकीवर लक्ष ठेवण्यासाठी 'रामगड' किल्ला बांधण्यात आला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या एका डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला. आजही किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज शाबूत आहेत.

इतिहास : रामगडची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. गडाचा इतिहास ज्ञात नाही. १८ व्या शतकात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये लढाई चालू होती. त्यावेळी तुळाजीने रामगड जिंकून घेतला होता. तेव्हा पेशव्यांचे सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होउन फेब्रुवारी १७९६ मध्ये रामगड जिंकला. ६ एप्रिल १८१८ ला रामगड किल्ल

ब्रिटीशांनी जिंकून घेतला. त्यावेळी गडावर २१ तोफा व १०६ तोफगोळे असल्याचा उल्लेख मिळतो.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

पहाण्याची ठिकाणे : गडाच्या पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो. गडाचे प्रवेशद्वार ८ फुट उंच आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला १८ फूट उंच बुरुज आहेत. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्यांची योजना केलेली आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस थोड्या अंतरावर अजून एक (चोर) दरवाजा आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला तटबंदी ठेऊन सरळ चालत गेल्यावर आपल्याला होळींच्या माळावर पोहोचतो. तेथे ७ तोफा रांगेत उलट्या पुरुन ठेवलेल्या दिसतात. त्यातील सर्वात मोठी तोफ ७ फूट लांबीची आहे. या तोफांसमोरच किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हे उत्तराभिमुख प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे. प्रवेशद्वाराच्या आत देवड्या आहेत. परंतू प्रवेशद्वारा बाजूच्या बुरुजांचे चिरे ढासळल्यामुळे प्रवेशद्वारातून रामगड गावातील होळीवाडीत जाणारा मार्ग बंद झाला आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या तटबंदीवरुन गड नदीचा प्रवाह दिसतो. गडाच्या मधोमध बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेले आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या तटावर काळ्या पाषाणातील गणपतीची अत्यंत सुबक मुर्ती आहे. बाजूलाच काही शाळूंका आहेत. या तटावरुन दुसर्‍या बाजूला पायर्‍यांनी उतरल्यावर आपण किल्ल्याच्या सध्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो व आपली गडफेरी पूर्ण होते. गडाला १८ फूट उंचीचे १५ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला ३ दिशांना खिडक्या आहेत. बुरुजांच्यामध्ये १८ फूटी तटबंदी असून तीने पूर्ण किल्ल्याला वेढलेले आहे. तटबंदीची लांबी अंदाजे ६४० मीटर आहे. गडावर किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा आहे, पण पाण्याची विहीर अथवा तलाव आढळत नाही.