भराडी देवी आंगणेवाडी | Bharadi Devi mandir - Angnewadi malvan

भराडी देवी आंगणेवाडी मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. श्री भरडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ठ ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने

्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. 'भरड' भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते कि, ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत. देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर ? अशी भिती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहित. असे या नवसाला पावणार्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो. या देवीचा जत्रॊत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. सामन्यपणे दिवाळीनंतर ग्रामस्थ देवीला कॊल लावून शिकारीला जातात. जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही. जेव्हा शिकार मिळते व तिचे ग्रामभोजन होते त्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करुन जत्रोत्सवाच दिवस निश्वित केला जातो.