पुर्णानंद स्वामी मठ - दाभोली , वेंगुर्ला | Purnanand Swami Math - Dabholi , Vengurla

पुर्णानंद स्वामी मठ दाभोली हे वेंगुर्ला तालुक्यातील निसर्ग रमणीय गाव असून, संतांची पुण्यभूमी म्हणून ओळखले जाते . गावाच्या मध्यभागी श्रीमत पुर्णानंद स्वामींचा मठ डौलाने उभा आहे . गाव डोंगर कपारीत असल्याने व पाण्याची मुबलकता असल्याने गावाचे हवामान प्रसन्न आणि निरोगी आहे . या ठिकाणी जागा निवडण्याचे काम ज्यांनी केले त्या " पूर्णानंद स्वामींचा " इतिहास असा आहे . " श्रीमत पूर्णानंद स्वामी हे आद्य कुदाल्देष्कार गौड ब्राह्मण समाजाचे गुरु म्हणून प्राधान्याने ओळखले जातात . आपला ज्ञाती समाज हा प्रथमतः बंगाल मधून आला . सुमारे ११ ते १२ शतकाच्या दरम्यान या समाजाची काही कुटुंबे कोंकणात कच्छ अखातातून समुद्र मार्गे विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ला, आदी बंदरातून

आली व आसपासच्या जवळच्या खेडेगावातून स्थायिक झाली. या पैकी सामंत देसाई घराण्यातील पूर्वजांनी कुडाळ प्रांतात विजापूरच्या मंडलिकत्वाखाली कुडाळ शहरी आपले राज्य प्रस्थापित केले. त्यामुळे कुडाळ देशकर गौड ब्राह्मण समाज हा समाज धुरीणांचा समाज बनला. बाराव्या शतकांपासून कुडाळ देशकर ब्राह्मण समाज सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मागे न राहता आघाडीवर प्रगतीने पुढे येत राहिला . कुडाळच्या सामंत देसाई राजवंशाने कुडाळ नजीक च्या सोनवडे (स्वर्णवट ) गावी तेराव्या शतकाच्या अखेरीस आपल्या वैदिक धर्माचा प्रसार करण्यासाठी आणि कुडाळ देशकर ब्राह्मण ज्ञातीचे स्वतःचे धर्मपीठ असावे म्हणून आचार्य परंपरेचा एक मठ स्थापन केला. या धर्मपीठाचे आद्यगुरु " श्रीमत विध्यापुर्णानंद स्वामी" हे होते. सर्व ज्ञाती बांधव त्यांना गुरुस्थानी मानत होते. आज जी दाभोली मठाच्या मुख्य गाभाऱ्यात मोठी संगमवरची बांधलेली समाधी दिसते ती श्रीमत पूर्णानंद स्वामींची आहे . आज हि या मठाचा परिसर पवित्र आणि प्रसन्न वातावरणाने भरलेला दिसतो . दाभोली मठाची गुरु परंपरा आज हि जिवंत असल्याची साक्ष या ठिकाणी प्रत्यक्षात दिसते. या दाभोली मठाची परंपरा आज वरवर २४ स्वामींनी सांभाळली आहे. दाभोली गुरुस्थानाचा परिसर बराच प्रशस्त आहे . महाद्वार पूर्वाभिमुख आहे . महाद्वारातून आत शिरल्यावर सभामंडपासमोर श्रीदेव नारायणाचे प्रथम दर्शन घडते. त्या नंतर थोडं आत गेल्यावर मध्य मंडपात श्रीमत पूर्णानंद स्वामींचे समाधी दर्शन घडते. या मठातील उत्सवांच्या दिवसांना प्रचंड गर्दी असते.