रेडी गणपती , वेंगुर्ला | Redi Ganpati Mandir , Vengurla

रेडी गणेश रेडी बंदर किनार्याजवळच लोह खनिजाच्या खाणीच्या परिसरात १८ एप्रिल १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मुर्ती दृष्टांत प्रकट झाली. या ठिकाणी श्रीगणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्ठीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते. रेडी येथील नागोळा वाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एक लोहखनिजाच्या कंपनीत नोकरीला होता. रेडीतील मायनिंगच्या खाणीवरुन बंदराकडे व बंदराकडून खाणीकडे त्याच्या लोहखनिज भरलेल्या ट्रकची सतत ये-जा होत असे दि. १८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ट ठिकाणी त्याने आपला ट्रक उभा केला व तो तेथेच झोपला. पहाटेच्या सुमारास त्याला स्वप्न पडले व स्वप्नामध्ये श्रीगणपतीने येऊन त्याच ठिकाणी खोदा आपले या ठिकाणी वास्तव्य आहे

सा दृष्टांत दिला. त्यानुसार श्री.कांबळी व श्री.वासुदेव जुवेलकर यांनी मायनिंग कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने खोदकामास सुरुवात केली. काही भागाचे खोदकाम करताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा व कानाचा भाग स्पष्ट दिसू लागला. लगेच ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या मंदिरात ही सर्व मंडळी गेली व त्यांनी देवीचा कौल घेतला. श्रीदेवी माऊलीने श्रीगणपतीच्या मूर्तीची त्याच ठिकाणी स्थापन करण्याचा कौल दिला. खोदकाम करता करता दि. १ मे १९७६ रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसली. श्री गणराया प्रगटले! ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेमध्ये कोरलेली होती व मूर्ती जांभ्या दगडाचीच होती. सुमारे सव्वा महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला. श्रीगणपतीच्या त्या मुर्तीला प्लास्टरिंग व रंगरंगोटी करुन सजविण्यात आले. श्रीगणेशाची ती द्विभुजा भव्य मूर्ती अतिशय देखणी व सुबक दिसते. नवसाला पावणारा हा रेडीचा श्रीगणेश भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले. प्रत्येक संकष्टीस व श्रीगणेशाच्या प्रगटदिनी अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या परिसरास जत्रेचेच स्वरुप असते. अनेक भाविक पर्यटक रेडीच्या या गणपतीच्या दर्शनासाठी अगत्याने श्रध्देने येतात.